प्रति,
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
मुजरा महाराज,
महाराज मला माहिती नाही मी लिहिलेलं हे सगळं तुमच्या पर्यँत पोहीचेल की नाही, मात्र आता हा निर्णय वाचून सुद्धा तुम्ही भाजपात जाणार असाल तर आम्ही काय बोलावे! अहो, आपल्या अगणित मावळ्यांनी रक्त सांडून, अनेक वार छाताडावर घेत, आपले जीव ओवाळून टाकत घेतलेले गडकिल्ले आता हॉटेलात बदलणार आहेत, तिथं पैशावाल्या बड्या बापाची लोकं आता पार्ट्या करतील, लग्न करतील, दारू ढोसतील!
कसं सहन करणार आपण हे महाराज! ज्या किल्ल्यावर पाय ठेवायच्या अगोदर आम्ही पहिल्या पायरीच्या नतमस्तक होतो, तिथली माती भंडारा समजून माथ्यावर लावतो आता त्याच मातीत आता असले धंदे सुरु होणारेत! कसं सहन करावं महाराज?
शिवबा आमचा मल्हारी गाणं म्हणत आम्ही आमच्या शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवत किल्ल्यावर जाताना आपण तीर्थक्षेत्रावर जातोय या भावनेने एक एक पायरी चढायचो, आमचा देव वसतो प्रत्येक गड कोटावर, त्या देवाच्या लाखो सैनिकांनी शेवटच्या श्वासापर्यँत राखले ते गडकिल्ले!
तिथल्या हवेत आम्हाला अजूनही “श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की…” च्या आरोळ्या ऐकू येतात, त्याच हवेत आता पार्ट्याचे आवाज ऐकू येतील राजे! ज्या गडावरलं पाणी आम्ही गंगाजळाहुन पवित्र मानायचो त्याच पाण्यात आता पैशाची नशा मिसळली जाईल! कसं सहन करावं राजे?
गड-किल्ले आम्हाला आमच्या बापाची आठवण करून देतात राजे, तिथल्या खंडर झालेल्या भग्न अवशेषात सुद्धा आम्हाला मांगल्य जाणवतं! अजूनही गडाचे इतिहास ऐकताना पराक्रमाने छाती भरून येते आणि मावळ्यांनी दिलेली आहुती आठवून डोळे भरतात! तिथले दगड, तिथल्या पडक्या तटबंद्या आणि बुरुज, इतरांसाठी ते सगळं भग्न असेल, पण आमच्यासाठी तिचं आमची द्वारका, तिचं मथुरा आहे!
ती अशी बाटली जाणार असेल तर कसं सहन करावं राजे?
राजे निर्णय घेणारे तुम्हीच आहात, तुम्हाला काही बोलायची औकात नाही आमची, गादीशी इमान हाय आमचं, पण तरीही लहानतोंडी मोठा घास घेतोय, तुम्हाला नाय पटत राष्ट्रवादी, खुशाल सोडा, इतर कुठंही जावा, सेनेत गेलात तरी चालेल किंवा तुम्ही तुमचा शिवविचारांवर चालणारा स्वतंत्र पक्ष काढा!
पण आपल्या मावळ्यांच्या घामाने आणि रक्ताने राखलेल्या किल्ल्यांचा, किल्ल्यांचा नव्हे तर आपल्या साठी मंदिराचा असा शनिवारवाडा करून त्यावर घटकंचुकी खेळत आणि मदिरेचे कारंजे उडवू पाहणाऱ्या असल्या पेशवाईच्या वाटेला जाऊ नका.
इतकं बोलून थांबतो राजे, काही चूक भूल झाली असेल तर बापाच्या मायेने माफ करा!
–छत्रपतींच्या गादीशी आजन्म एकनिष्ठ मावळा.
आशुतोष शिपलकर
Advertise

with thanks from - https://khaasremedia.com/गडकिल्ले-भाड्याने/?fbclid=IwAR1C1z9xvB7li3SuhE10dK8Kpms-ZtOTUjz6CeTamUpbQ4m8aVqYFlntnW0
Advertise