विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. भाजप , शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षांनी तर यात्रांच आयोजन करून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसने देखील पुढचं पाऊल टाकत सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी महापर्दाफाश यात्रा काढली आहे. अमरावतीतून या यात्रेला सुरुवात होताचं कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. तर मंत्री गिरीश महाजन यांना ‘जोकरमंत्री’ची उपमा दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला 50 कोटी रुपये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीत टेंडर न काढता कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. 5 वर्षात ओबीसींची शिष्यवृत्ती थांबवली. तर हे सरकार sc, st, obc विरोधी असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरावरून नाना पटोले यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापूरवर पुराची स्थिती ओढवली. गिरीश महाजन हे जोकरमंत्री आहेत.’ अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीला नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातूनच महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर आता काँग्रेसच्या वतीने आजपासून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वात ‘महापर्दाफाश’ यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेतून कॉंग्रेस पक्ष जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे.

Image result for nana patole